​सावंतवाडी : सावंतवाडी वनविभागाची धडक कारवाई; आंबोली-दोडामार्गात अवैध शिकारींचा पर्दाफाश

शेअर करा

दोन वेगवेगळ्या रात्रीच्या कारवाईत आरोपी ताब्यात; मृत वन्यप्राणी, शिकारीची हत्यारे आणि आलिशान ‘एमजी हेक्टर’ कार जप्त.

​सावंतवाडी,दि.१८ जून
सावंतवाडी वनविभागाने आंबोली आणि दोडामार्ग वनक्षेत्रात दोन वेगवेगळ्या रात्री धडक कारवाया करत अवैध शिकार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत वन्यजीवांची शिकार करणाऱ्या आरोपींसह मृत प्राणी, शिकारीची हत्यारे आणि एक आलिशान ‘एमजी हेक्टर’ कार जप्त करण्यात आली आहे.


​पहिली कारवाई १७ जून रोजी रात्री घडली. आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्रातील गाव मासुरे येथील शासकीय जंगलात विनापरवाना बंदुकीच्या साहाय्याने शिकार होणार असल्याची गोपनीय माहिती सहायक वनसंरक्षक सावंतवाडी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या अंधारात गस्त घालून सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करत विठू वाघू कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक ठासणीची बंदूक, छरे, दारूगोळा, विजेरी (टॉर्च) आणि शिकार केलेले ‘साळिंदर’ (Porcupine) जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


​ही कारवाई ताजी असतानाच, १८ जून रोजी पहाटेच्या सुमारास गाव नेने शासकीय जंगलात दुसरी कारवाई करण्यात आली. शिरगावकर पॉईंट वन्यक्षेत्रात पहाटे संशयास्पद रित्या फिरणाऱ्या ३ इसमांचा वनविभागाच्या पथकाने पाठलाग केला. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एक विनापरवाना बंदूक, ७ जिवंत काडतुसे, २ वापरलेली काडतुसे, २ टॉर्च आणि तलवारी आढळून आल्या. तसेच त्यांच्याकडून बंदूक व हत्यारांच्या साहाय्याने ठार केलेले १ मृत भेकर, १ पिसोरी (Mouse Deer) आणि १ कटीदर (Asian Palm Civet) हा वन्यजीव मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे शिकारी कोल्हापूर येथून ‘एमजी हेक्टर’ (क्र. MH 09 GF 0014) या आलिशान कारमधून आले होते. वनविभागाने कारसह ४ सोबत्यांना घटनास्थळीच अटक केली आहे.


​ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल वैभव भिसे, नामदेव चोगले, मेहुब नायकवडे, सम्राट पाटील, गोरक्ष राणे, रविंद्र पाटील, संग्राम पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख आणि आर.आर.टी. (RRT) टीमने यशस्वी केली.


​पश्चिम घाटातील आंबोली परिसरातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वनविभाग कटिबद्ध असून, नागरिकांनी परिसरात कोणत्याही प्रकारची शिकार किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी केले आहे.

शेअर करा