Sawantwadi : सावंतवाडीच्या मोती तलावात सांडपाणी; आठ सोसायट्यांना नगरपरिषदेचा अल्टिमेटम!

शेअर करा

तलावाच्या प्रदूषणामुळे अस्तित्व धोक्यात; २४ तासांत सांडपाणी व्यवस्थापन करा, अन्यथा नळ जोडण्या तोडण्याचा नगरपरिषदेचा इशारा!

​सावंतवाडी,दि.२२ ऑक्टोंबर
सावंतवाडी शहरातील मोती तलावात सांडपाणी सोडत असल्याप्रकरणी नगरपरिषदेने कडक पावले उचलली आहेत. शहरातील आठ रहिवासी सोसायट्यांनी सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने गटारातून थेट तलावात सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे पाण्यावर हिरवा थर पसरून तलावाचे प्रदूषण होत असून, त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने संबंधित सोसायट्यांना २४ तासांचा अल्टिमेटम देत नळ जोडण्या कापण्याचा इशारा दिला आहे.
माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. याची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी २० ऑगस्ट व ८ सप्टेंबर २०२६ रोजी दोनदा नोटिसा देऊनही कोणतीही सुधारणा न झाल्याने आता अंतिम ताकीद देण्यात आली आहे.
​नगरपरिषदेच्या आदेशानुसार:
​२४ तासांत सांडपाणी बंद करणे: तलावात सोडले जाणारे सांडपाणी त्वरित बंद न केल्यास नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत नळ कनेक्शन तोडले जाईल.
​शौचालय टाक्यांची स्वच्छता: इमारतीच्या शौचालयाच्या टाक्या सक्शन व्हॅनद्वारे तत्काळ साफ करून दुरुस्त कराव्यात.
सांडपाणी फिल्टर करण्यासाठी प्लांट बसवून तो कार्यान्वित करण्याची कार्यवाही ८ दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
​मोती तलावात गणपती विसर्जन, नारळी पौर्णिमा असे महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात. वाढत्या प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारींवर आधारित ही कारवाई केली जात असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांनी दिली आहे.

शेअर करा