अन्यथा १५ ऑगस्टला उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा
सावंतवाडी,दि.०३ ऑगस्ट
तालुक्यातील कलंबिस्त गावातील बेकायदेशीर बिअर शॉपी तातडीने बंद करण्यात यावी आणि या परिसरातील अवैध दारूधंद्यांना आळा घालण्यात यावा, अशी जोरदार मागणी कलंबिस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची दिशाभूल करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे बिअर शॉपीला परवानगी देण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयाला भेट देऊन नायब तहसीलदार मनोज मुसळे आणि पोलीस प्रशासनाला हे निवेदन सुपूर्द केले.
निवेदनाद्वारे केलेले गंभीर आरोप:
खोटे ठराव व कागदपत्रे: कलंबिस्त ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर व खोटा ठराव दाखवून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करत या बिअर शॉपीला परवानगी मिळवण्यात आली आहे.
ग्रामसभेचा अनादर: ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव मंजूर झालेला असतानाही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
खोट्या सह्यांचा वापर: २५ जून रोजी दारूबंदी विषयावर विशेष चर्चा झाली होती. या ग्रामसभेला केवळ १८ ग्रामस्थ उपस्थित असताना त्यांच्या सर्व सह्या खोट्या मारण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच कोणताही अधिकृत ठराव होण्यापूर्वीच ना-हरकत दाखला देण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
तरुणांवर दुष्परिणाम व तंटे: या बिअर शॉपीमुळे आणि अवैध दारू विक्रीमुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील शाळकरी मुले व तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहे. परिणामी, गावात आणि लगतच्या परिसरात सातत्याने वाद-विवाद व तंटे निर्माण होत आहेत.
शिष्टमंडळात कोणाचा समावेश होता?
निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पास्ते, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विजय कदम, ज्येष्ठ ग्रामस्थ बाबू सावंत, निखिल सावंत, काशीराम म्हाडगुत आदी प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”आमचे गाव आणि संपूर्ण पंचक्रोशी दारूमुक्त व्हावी हीच सर्व ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर बिअर शॉपी आणि अवैध दारूधंदे तत्काळ बंद करण्यात यावेत,” अशी मागणी शिष्टमंडळाने शेवटी केली आहे.