सावंतवाडी,दि.०५ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपची विस्तारित कार्यकारिणी सभा येत्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही सभा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी उपसभापती गौरव मुळीक, तालुकाध्यक्ष संतोष राऊळ, शहराध्यक्ष सुधीर आरीवडेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, दिलीप भालेकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष श्री. परब आदी उपस्थित होते.
या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्हाभरातील विस्तारित कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर तसेच खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमात दोघांचेही जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी कामांचे कौतुक करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात येणाऱ्या ‘सेवा सप्ताह’ अभियानाचे नियोजन केले जाईल. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून यशस्वी २५ वर्षे जनसेवा पूर्ण केल्याबद्दल हे अभियान राबवले जाणार आहे.
याशिवाय, बूथनिहाय मतदार नोंदणीचा आढावा घेऊन निवडणूक व संघटनेच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन केले जाणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्तास्थाने असून पक्ष अधिक मजबूत होत आहे, असा विश्वासही प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.