अमित शाह आणि पोलिस अधीक्षकांच्या विधानांचा हवाला देत डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा थेट आरोप
सावंतवाडी,दि.०७ सप्टेंबर
केवळ सावंतवाडी शहरच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अंमली पदार्थांचा (ड्रग्स) अक्षरशः सुळसुळाट झाला असून, जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विषारी विळखा बसल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. शाळा आणि कॉलेजमधील तरुण पिढी या नशाखोरीच्या आहारी जात असून, या गंभीर परिस्थितीवर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पोलिस प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात बोलताना “देशात एक ग्रॅमही ड्रग्स येऊ देणार नाही,” असे विधान केले होते. तर दुसरीकडे, गेल्या गुरुवारी सावंतवाडीत झालेल्या एका जाहीर मुलाखतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी “ड्रग्सच्या बाबतीत अजूनही सिंधुदुर्ग जिल्हा हॉटस्पॉट झालेला नाही, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे,” असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शाळा-कॉलेज परिसरात उघड विक्री, भ्रष्टाचाराचा संशय
डॉ. परुळेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, वारंवार होणारे पेपर लीक, वाढती बेरोजगारी, कौटुंबिक वाद आणि जीवनातील वैफल्यामुळे तरुण मुले अंमली पदार्थांच्या मार्गाला लागत आहेत. परंतु, शाळा आणि कॉलेजच्या परिसरातच अत्यंत सहजतेने ड्रग्स उपलब्ध होत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. भ्रष्टाचाराच्या वरदहस्ताशिवाय अशा पद्धतीने उघडपणे ड्रग्स मिळणे शक्यच नाही.
पोलिस यंत्रणेकडे गुप्तचर विभाग असताना जिल्ह्यात ड्रग्स कुठे विकले जातात? मुख्य पेडलर कोण आहेत? आणि यामागील मास्टरमाइंड कोण आहे? याची इत्यंभूत माहिती पोलिसांना नाही, यावर सामान्य जनतेचा विश्वास बसू शकत नाही, असा घणाघात त्यांनी केला.
पोलिस अधीक्षक जबाबदारी झटकत असल्याचा आरोप
पोलिस अधीक्षक जेव्हा या समस्येला केवळ पोलिस जबाबदार नसून पालक, शिक्षक आणि समाजही तेवढाच जबाबदार असल्याचे सांगतात, तेव्हा ते स्वतःच्या खात्याची जबाबदारी नाकारत असल्याचे स्पष्ट होते. एमडीएमए, म्यांव म्यांव, एक्स्टसी यांसारख्या धोकादायक ड्रग्सचे सेवन मुलगा किंवा मुलगी करत आहे हे पालक-शिक्षकांच्या लक्षात येईपर्यंत कित्येक महिने निघून जातात आणि परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
पोलिस खात्याने खरंच मनात आणले, तर २४ तासांच्या आत सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्समुक्त होऊ शकतो. मात्र, त्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज आहे. मुलाखती देणे सोपे आहे, परंतु माजी पोलिस अधीक्षक प्रसन्ना साहेबांसारखी धडाकेबाज कारवाई करून रिझल्ट देणे कठीण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमदार निलेश राणेंच्या आरोपांचे पुढे काय झाले?
दोन महिन्यांपूर्वी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी अवैध दारू आणि अंमली पदार्थांसंदर्भात पुराव्यानिशी आरोप केले होते. त्या आरोपांचे पुढे काय झाले? असा सवाल आता जिल्ह्यातील सामान्य जनता विचारत आहे. सिंधुदुर्गातील संपूर्ण पिढी बरबाद होत असताना गप्प बसता येत नसल्यानेच हा पत्रप्रपंच करत असल्याचे सांगत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पोलिस प्रशासनाला तात्काळ कडक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.