‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेता हर्ष नकाशे १३ ऑगस्ट रोजी मये-डिचोली येथे सादर करणार विशेष गायन; उत्कर्षा फोंडेकर व मिलिंद परब यांची साथ
सावंतवाडी,दि.०७ ऑगस्ट
मये गोवा येथील सम्राट क्लबतर्फे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ‘सम्राट संगीत सभेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गावकारवाडा, मये-डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात पार पडणार आहे.
या विशेष संगीत सभेत सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा विजेता हर्ष नकाशे हा आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या मैफिलीत त्याला कु. उत्कर्षा फोंडेकर यांची हार्मोनियमवर तर कु. मिलिंद परब यांची तबल्यावर उत्कृष्ट साथ लाभणार आहे.
गोवा व सिंधुदुर्गातील संगीतप्रेमींसाठी ही संगीत सभा म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरणार आहे. या संगीतमय मैफिलीला सर्व संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.