सावंतवाडी : कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला स्थगिती; शेतकऱ्यांच्या दबावामुळे शासनाचा फेररचनेचा निर्णय

शेअर करा


​सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाची आग्रही मागणी यशस्‍वी; बांधावर काम करणाऱ्या कृषी सहाय्यकांची संख्या वाढवण्याची विलास सावंत यांची मागणी

​सावंतवाडी,दि.२५ सप्टेंबर*


राज्य शासनाच्या कृषी विभागाचा वादग्रस्त सुधारित आकृतीबंध रद्द करून तो फेररचनेसाठी मागे घेण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शेतकरी संघटनांनी एकजुटीने उठवलेल्या आवाजामुळे शासनाला हा निर्णय बदलावा लागला असून, २००९ चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
​मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चेनुसार, कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदे, विविध संवर्गांची आवश्यकता आणि शेतकरी केंद्रित योजनांचा विचार करून सर्वंकष आढावा घेण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. यापूर्वी ‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ मोहिमेची पहिली हाक सिंधुदुर्गातून उठली होती आणि तिचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्याच धर्तीवर कृषी आकृतीबंधाबाबतही सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनांनी पाठिंबा दिला.
​कार्यालयीन स्टाफऐवजी बांधावरील ‘कृषी सहाय्यक’ वाढवा असे आवाहन विलास सावंत यांनी केले आहे.
​रद्द करण्यात आलेल्या नवीन आकृतीबंधात प्रत्यक्षात शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहाय्यकांची पदे कमी करून कार्यालयीन कर्मचारी वाढवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. श्री. विलास सावंत यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातून कारभार चालवण्याऐवजी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक कृषी सहाय्यक देण्याची गरज आहे. महसुली गावांच्या तुलनेत कृषी सहाय्यकांची संख्या अत्यंत तोकडी आहे.
​उदाहरणासहित सांगायचे तर, ५६ महसुली गावे असलेल्या दोडामार्ग तालुक्यात केवळ ७ कृषी अधिकारी, तर ८५ महसुली गावे असलेल्या सावंतवाडी तालुक्यात अवघे २८ कृषी सहाय्यक आहेत. ४३ हजार ५०० हून अधिक गावे असलेल्या महाराष्ट्रात फक्त ११ हजार ४४५ कृषी सहाय्यक असणे हे कृषीप्रधान राज्याला शोभणारे नाही.
​पावसाची प्रचंड तूट; दुष्काळी परिस्थितीत सहाय्यकांची अधिक गरज:
सिंधुदुर्ग ​जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत अवघा २१३८.४ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो ३६०९ मिमी होता. सुमारे १४७० मिमी पावसाची तूट निर्माण झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहाय्यकांची आणि मंडळ कार्यालयांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे शासनाने नवीन फेररचनेत कृषी सहाय्यक व मंडळ कार्यालयांची संख्या वाढवावी, अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

शेअर करा