सावंतवाडी शहरात भटके कुत्रे आणि वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

शेअर करा

नगरपरिषद आणि वनविभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी


​सावंतवाडी, दि. २५ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
सावंतवाडी शहर आणि परिसरात सध्या भटके कुत्रे तसेच माकड व वानरांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपरिषदेने घेतलेले निर्णय केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून लहान मुले व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपरिषदेने या भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी शहरात विशिष्ट ‘फीडिंग पॉईंट्स’ निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा उपक्रम केवळ कागदावरच राहिल्याची टीका होत आहे.
​दुसरीकडे, सावंतवाडी शहराला लागूनच असलेल्या नरेंद्र डोंगराच्या भागात वन्यप्राण्यांचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून या भागातून शहरात येणाऱ्या माकड आणि वानरांच्या टोळ्यांनी नागरिकांना हैराण केले आहे. घरांच्या छतांवर, गॅलरीमध्ये आणि झाडांवर ठाण मांडून बसणारी माकडे अन्नधान्य व साहित्याची नासधूस करत आहेत. तसेच परिसरातील बागायतदारांच्या शेती व फळबागांचेही यामुळे मोठे नुकसान होत आहे.
​शहरातील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने नसबंदी आणि जलदगतीने उपाययोजना कराव्यात, तसेच माकड व वानरांच्या उपद्रवापासून सुटका करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पुढाकार घेऊन ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावंतवाडीकर नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा