सावंतवाडी,दि.१८ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर सक्तीला वीज ग्राहकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. संतप्त ग्राहक थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन आपला विरोध नोंदवत असून, वीज ग्राहक संघटना देखील ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून मैदानात उतरल्या आहेत. मात्र, ग्राहकांचा हा विरोध डावलून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
दरम्यान, ग्राहकांना न विचारता परस्पर मीटर बसवणे आणि स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल येणे या तक्रारींवर महावितरणने आपली बाजू स्पष्ट केली आहे. “सिंधुदुर्गात स्मार्ट मीटरबाबत पसरलेले गैरसमज चुकीचे असून ही मोहीम भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि महावितरणच्या आधुनिकीकरण धोरणांतर्गत सुरू आहे,” अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
वीज बिलात सूट: स्मार्ट मीटरमध्ये सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत होणाऱ्या वीज वापराच्या नोंदीवर घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैशांची सूट दिली जात आहे.
या मीटरमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक रीडिंग मिळणार असून, ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे आपल्या वीज वापराचे थेट नियंत्रण करता येईल, असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांना लेखी पत्राद्वारे किंवा तोंडी कल्पना दिल्याशिवाय मीटर बदलले जात नाही. ज्या ग्राहकांचा तीव्र विरोध आहे, त्यांना महावितरणतर्फे या मीटरचे फायदे समजावून सांगितले जात आहेत.ते म्हणाले,रीडिंगमध्ये तफावत नाही. जुने मीटर आणि स्मार्ट मीटर दोन्ही सारखेच रीडिंग दाखवतात. ग्राहकांच्या खात्रीसाठी दोन्ही मीटर एकत्र बसवून प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले आहे. तरीही बिलात काही चूक किंवा तफावत आढळल्यास ती दुरुस्त करून दिली जाईल, असे आश्वासन श्री. राख यांनी दिले.
ग्रामीण भागात ४८ तासांपेक्षा जास्त आणि शहरी भागात २४ तासांपेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित राहिल्यास नियमानुसार ग्राहकांना मोबदला मिळू शकतो, अशी माहिती अधीक्षक अभियंत्यांनी दिली. यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन तक्रार करणे आवश्यक असून, आतापर्यंत अनेक ग्राहकांना असा मोबदला मिळाला आहे. मात्र, पावसाळ्यात वीज आणि वादळी वाऱ्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळ वीज पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.