सावंतवाडी : आसोली शाळेत रानभाज्यांच्या महोत्सवातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची पर्वणी

शेअर करा

आसोली नं. १ शाळेत रानभाज्यांचा अनोखा बाजार,विद्यार्थ्यांनी थाटले विविध स्टॉल

प्रदर्शनात पाडलोस कृषी विद्यालयाचे सूर्यकांत कुलाळ यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी,दि.०८ ऑगस्ट

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्थानिक परिसरातील रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे पोषणमूल्य व आरोग्यविषयक महत्त्व समजावे तसेच पारंपरिक ज्ञानाची जपणूक व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनाला मार्गदर्शक म्हणून पाडलोस कृषी विद्यालयाचे सूर्यकांत कुलाळ यांनी येथील विद्यार्थ्यांना,पालकांना व ग्रामस्थांना रानभाज्या व कृषी विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर पाडलोस कृषी विद्यालयाचे सूर्यकांत कुलाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा परिधी किनळेकर , उपाध्यक्षा आरती सांगळे,आरवली केंद्राचे केंद्रप्रमुख मारुती गुडुळकर, प्रसाद गावडे ,अमोल आंग्रे, शिवशंकर पांचाळ, विकास ठोंबरे ,तेजस पाटील ,शरद पवार,माजी अध्यक्ष राजन धुरी , मदन मुरकर,आसोली शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी रायशिरोडकर उपस्थित होते.

महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या परिसरात रानभाज्यांचा प्रत्यक्ष बाजार भरविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच खाद्यपदार्थ व इतर वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले. विद्यार्थ्यांनी स्वतः विक्रेते आणि ग्राहकाची भूमिका पार पाडत खरेदी-विक्रीचे व्यवहार, पैशांची देवाणघेवाण, हिशोब, किंमत ठरविणे आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत QR कोडद्वारे व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ रानभाज्यांची ओळखच नव्हे, तर व्यवहारज्ञान व डिजिटल आर्थिक साक्षरतेचे धडे मिळाले.
या बाजारात आसोली नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध स्टॉल लावले. तसेच परिसरातील इतर शाळांनीही विद्यार्थ्यांसह उपस्थित राहून रानभाजी बाजारात आपले स्टॉल उभारून सहभाग घेतला. सखैलेखोल ,राजधुरी शाळा फणसखोल शाळा यात सहभागी झाल्या होत्या.
या प्रदर्शनात शाळेबरोबर आसोलीतील सर्व अंगणवाडी ताई व मदतनीसांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यात राजधुरी अंगणवाडी, वडखोल अंगणवाडी , फणसखोल अंगणवाडी, सक्राळ अंगणवाडी आणि आसोली अंगणवाडी या सर्व अंगणवाडी केंद्रांच्या ताई व मदतनीसांनी महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्या सहभागामुळे शाळा व अंगणवाडी यांच्यातील समन्वय, पालक-समुदायाचा सहभाग आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीची सामूहिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवाचे वातावरण अधिक आनंददायी व उत्साहपूर्ण झाले.

महोत्सवासाठी पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला तसेच विष्णू घाडी यांनीही विद्यार्थ्यांसाठी खाऊची व्यवस्था तर विश्वनाथ धुरी यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी आर्थिक मदत केली. ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालकांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

रानभाज्यांचे संवर्धन, स्थानिक अन्नसंस्कृतीची ओळख, आरोग्यदायी आहार, पर्यावरण संवर्धन, विद्यार्थ्यांचे कौशल्यविकास आणि व्यवहारज्ञान या सर्व बाबींचा सुंदर संगम या महोत्सवातून घडून आला.
“रानभाज्यांची ओळख, पोषणाची वाटचाल आणि व्यवहारज्ञानाची शिकवण” देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरला.

कार्यक्रमाची प्रस्तावना फणसखोल शाळेचे मुख्याध्यापक गावडे यांनी केले तर आभार आसोली शाळेचे शरद पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका वैभवी राय शिरोडकर , शिक्षक व पालकांनी केले.

शेअर करा