सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर; ग्रामस्थांची वाहतूक गैरसोय दूर करण्याची मागणी.
सावंतवाडी ,दि.०५ ऑगस्ट
नाणोस गावात एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी केली आहे. आज सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
सावंतवाडी आगारातून सकाळी ०८:३० वाजता सुटणारी सावंतवाडी- शिरोडा एसटी बस शिरोडा येथून ०९:३० वाजता नाणोस मार्गे शिरोडा-सावंतवाडी अशी फेरी सुरू होती. तसेच दुपारी १२:३० वाजता सुटणारी शिरोडा-सावंतवाडी, नाणोस, गुळदुवे, आरोंदा खरी मळेवाड मार्गे सावंतवाडी सुरू होती. तसेच शिरोडा – नाणोस ही संध्याकाळी ०५:३० वाजता नाणोस अशी फेरी सुरू होती. मात्र नाणोस-शेट्येवाडी येथील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे बस सेवा बंद करण्यात आली होती. आता नाणोस शेटयेवाडी येथील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली झाडी साफ करण्यात आली आहे. ही बस सुरु झाल्यास शिरोडा येथे शाळेत जाणारे विद्यार्थी विक्रेते व प्रवासी यांना ही बस सेवा सोयीची ठरणार आहे. ही बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी असे निवेदन आज जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा सोनू कवठणकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांना दिले.