सावंतवाडी :गळा दाबून खुनाचा प्रयत्न व विनयभंग केल्याच्या आरोपातून सावंतवाडीतील संशयिताची निर्दोष मुक्तता

शेअर करा

सावंतवाडी,दि.७ जुलै
गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करणे आणि विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपातून कोनशी टेंबवाडी (ता. सावंतवाडी) येथील संशयित आरोपी बाबलो शंकर वरक याची ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
२२ मे २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी तरुणी नदीकाठच्या जमिनीतील पाण्याचा पंप बंद करून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निर्जन पायवाटेने घराकडे परतत होती. त्या वेळी संशयित आरोपी बाबलो वरक याने तिचा हात धरून विनयभंग केला, असा आरोप ठेवण्यात आला होता. तरुणीने स्वतःला सोडवून घेत ओरडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे तोंड दाबून आणि गळा आवळून तिला जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी बेशुद्ध पडल्याने ती मृत झाली असे समजून आरोपी तेथून पळून गेला होता. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध भा.दं.सं. कलम ३०७ आणि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून ओरोस न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, साक्षीदारांच्या जबाबामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून आली. संशयित आरोपीविरुद्ध सबळ व ठोस पुरावा सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याने, न्यायालयाने आरोपी बाबलो वरक याची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
​आरोपीच्या वतीने प्रमुख वकील म्हणून ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. गणेश प्रकाश चव्हाण, ॲड. प्रितेश लक्ष्मण गवस, ॲड. दत्तप्रसाद विभास ठाकूर, ॲड. केतन नारायण जाधव व ॲड. वामन सखाराम गवस यांनी सहकार्य केले.

शेअर करा