सावंतवाडी,दि.९ सप्टेंबर
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षशिस्तीचा भंग करत पक्षाच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन भाजप पक्षाकडून अखेर रद्द करण्यात आले आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होऊन काम करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत पक्षाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवली होती, तर काहींनी पक्षाविरोधात काम केले होते. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे पक्षाने या सर्व पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.
निलंबनाच्या कारवाईनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत निलंबन मागे घेण्यासाठी पक्षाकडे रीतसर विनंती अर्ज केले होते. प्राप्त अर्जांवर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार या सर्व १३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केला.
निलंबन रद्द झालेले पदाधिकारी:
नितीन एकनाथ राऊळ (जिल्हा परिषद सदस्य)
डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा (जिल्हा परिषद सदस्य)
सुजाता अजित पडवळ (जिल्हा परिषद सदस्य)
जितेंद्र पांडुरंग गावकर (पंचायत समिती सदस्य)
शर्वाणी शेखर गावकर
स्वागत रघुवीर नाटेकर
योगेश अशोक केणी
उल्हास उत्तम परब
स्नेहल संदीप नेमळेकर
साक्षी संदीप नाईक
सुप्रिया शैलेश नाईक
प्रवीण नारायण गवस
अनिरुद्ध फाटक
यांचा समावेश आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार काही ठिकाणी पराभूत झाले होते. आता या निलंबन रद्द मुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना भाजप मध्ये सक्रिय काम करता येणार आहे.