सावंतवाडी टर्मिनस वर रुळांऐवजी काँक्रीटचा विस्तार; सावंतवाडी टर्मिनस केवळ कागदावरच?

शेअर करा

प्लॅटफॉर्म क्र. ३ च्या मोकळ्या जागेत इमारतीचा घाट; लूप लाईन व नव्या फलाटांची जागा अडवून गाड्या मडगावला पळवण्याचा डाव असल्याचा प्रवाशांचा संताप.

सावंतवाडी,दि.२२ सप्टेंबर
​कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या हक्कासाठी मंजूर झालेले ‘लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ प्रत्यक्षात साकारण्याआधीच कोकण रेल्वे प्रशासनाच्या अदूरदर्शी आणि अजब कारभाराच्या विळख्यात सापडले आहे! टर्मिनसचा खरा आत्मा असलेल्या रेल्वे रुळांचा (लूप लाईन) व अतिरिक्त फलाटांचा विस्तार करण्याऐवजी, त्यासाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेतच प्रशासकीय इमारतीचे काँक्रीटचे जंगल उभारण्याचा घाट कोकण रेल्वेने घातला आहे. प्रशासनाच्या या आत्मघातकी नियोजनामुळे भविष्यातील यार्ड विस्ताराला कायमचा सुरुंग लागणार असून, सावंतवाडी टर्मिनस केवळ नावापुरतेच उरेल, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकाराविरोधात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत प्रस्तावित बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी थेट कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

रुळांची जागा गिळंकृत करण्याचा डाव?*
​सावंतवाडी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ लगतची मोकळी जागा ही भविष्यातील चौथी लूप लाईन, अतिरिक्त प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि स्टेबलिंग लाईन (गाड्या उभ्या करण्यासाठीचा ट्रॅक) टाकण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या एकमेव उपलब्ध व योग्य जागा आहे. मात्र, महामंडळाने या मोकळ्या जागेतच टर्मिनस इमारतीचे बांधकाम प्रस्तावित केले आहे. जर येथे सिमेंट-काँक्रीटची इमारत उभी राहिली, तर स्थानकाच्या या बाजूचा रेल्वे विस्तार कायमस्वरूपी ‘लँडलॉक’ (बंदिस्त) होईल. भविष्यात प्रवाशांची वर्दळ वाढली तरी एकही नवा ट्रॅक अथवा फलाट उभारणे अशक्य ठरेल.
​इमारत देखणी, पण गाड्या थांबणार कुठे?

​टर्मिनस म्हणजे केवळ प्रवाशांना आकर्षित करणारी चकचकीत इमारत नव्हे, तर गाड्या थांबवणे, वळवणे, त्यांची देखभाल करणे आणि क्रॉसिंग सुरळीत चालवण्यासाठी लागणारी ‘लाईन कपॅसिटी’ असते. अतिरिक्त लूप लाईन आणि प्लॅटफॉर्मच नसतील, तर सावंतवाडीतून नव्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणे आणि त्यांचे रॅक उभे करणे अशक्य होईल. यामुळे गाड्यांची नियमित वॉशिंग, अंतर्गत स्वच्छता आणि तांत्रिक तपासणीसाठी जागाच शिल्लक राहणार नाही.


​गाड्या मडगावला पळवण्याचा संशय!
​सध्या सावंतवाडीतून धावणारी हक्काची ‘तुतारी एक्सप्रेस’ तसेच नुकतीच सुरू झालेली ‘सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस’ या गाड्यांसाठी सावंतवाडीत देखभाल व स्टेबलिंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही, असा कांगावा भविष्यात रेल्वे प्रशासनाकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. ही तांत्रिक अडचण पुढे करून सावंतवाडीच्या हक्काच्या गाड्या पुन्हा मडगाव (गोवा) किंवा इतरत्र वळवण्याचा हा पूर्वनियोजित डाव तर नाही ना, असा रास्त संशय आता प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

​‘रेल हॉटेल’ची घोषणाही हवेतच विरणार.
​सावंतवाडी हे कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘रेल हॉटेल’ उभारण्याची संकल्पना मांडली होती. परंतु, रेल्वेच्या मूळ टर्मिनस यार्डचाच बळी देऊन जर इमारतीचे काम रेटले गेले, तर ही ‘रेल हॉटेल’ची घोषणाही केवळ कागदावरच उरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

​”टर्मिनसच्या नावाने प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. ट्रॅकच्या जागेत इमारतीचे बांधकाम करून कोकण रेल्वे टर्मिनसचा मूळ हेतूच मारून टाकत आहे. प्रशासनाने ही जागा केवळ रुळांसाठी आरक्षित ठेवून इमारतीसाठी पर्यायी जागा शोधावी. प्रवासी संघटनांना विश्वासात घेऊन सुधारित यार्ड आराखडा जाहीर न केल्यास कोकणातील जनतेला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
— सागर तळवडेकर, उपाध्यक्ष – कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
प्लॅटफॉर्म क्रमांक ३ समोरील मोकळ्या जागेतील प्रस्तावित इमारत बांधकामाला त्वरित ‘स्थगिती’ द्या. सदर मोकळी जागा केवळ नवीन लूप लाईन, अतिरिक्त प्लॅटफॉर्म व स्टेबलिंग लाईनसाठीच आरक्षित ठेवा. ट्रॅक विस्तारात अडथळा ठरणार नाही अशा पर्यायी जागेत इमारतीचे बांधकाम करून सुधारित यार्ड आराखडा (Revised Yard Plan) तातडीने जाहीर करा, आदी मागण्यांचे निवेदन सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे, नितीन गावडे व रिक्षा युनियनचे पदाधिकारी, प्रवासी यांनी केली आहे. त्यासाठी रूळ उपलब्ध करून देणाऱ्या जागेवर इमारत बांधण्यात येणार आहे ते काम थांबवून पर्यायी जागेचा वापर केला पाहिजे अशी मागणी व्यवस्थापकीय संचालक, आमदार दीपक केसरकर आदींकडे करण्यात आली आहे.

शेअर करा