सावंतवाडी दि.२२ ऑगस्ट
विविध विषयांवर विद्यावाचस्पती (पीएचडी) ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या तीन महिला सभासदांचा सावंतवाडी वकील कक्षात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन नुकताच सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सौ. अश्विनी लेले, सौ. अस्मिता अच्युत सावंत-भोसले आणि सौ. शितल अभिजित टिळवे अशी सत्कारमूर्ती महिला वकिलांची नावे आहेत.
या सत्कार सोहळ्यात सौ. अश्विनी लेले यांनी २०१४ मध्ये “कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणाचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर जे.जे.टी. विद्यापीठ (राजस्थान) येथून पीएचडी संपादन केली. त्यांचा सत्कार सावंतवाडी बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सौ. अस्मिता अच्युत सावंत-भोसले यांनी “किशोरवयीन गुन्हेगारीचा सखोल अभ्यास” या अत्यंत संवेदनशील विषयावर प्रबंध सादर करून सेज विद्यापीठ (भोपाळ) येथून पीएचडी मिळवली. त्यांचा सत्कार सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच सौ. शितल अभिजित टिळवे यांनी “महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील बालदत्तक प्रक्रियेचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर सेज विद्यापीठ (भोपाळ) येथून पीएचडी पदवी संपादन केली. त्यांचा सत्कार सावंतवाडी बारच्या ज्येष्ठ महिला सभासद ॲड. नीता सावंत-कविटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
ॲड. दिलीप नार्वेकर
या तिन्ही महिला सभासदांनी पीएचडी पदवी मिळवून सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या प्रतिमेत मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी मिळवलेले यश हे वकील संघटनेच्या इतर सभासदांना मार्गदर्शक व प्रोत्साहन देणारे आहे, अशा शब्दांत ॲड. दिलीप नार्वेकर यांनी कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना तिन्ही सत्कारमूर्तींनी “हा आपल्या घरातीलच सत्कार आहे,” असे सांगत सावंतवाडी वकील संघटनेचे आभार मानले. ॲड. डॉ. अस्मिता सावंत यांनी पीएचडी पूर्ण करण्याची प्रक्रिया विशद केली. आता या तिन्ही महिला वकील नवीन संशोधन व प्रबंध लिहिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला सावंतवाडी वकील संघटनेचे ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. अनिल केसरकर, ॲड. माधवी पेंडूरकर, ॲड. धनंजय पेंडूरकर, ॲड. तृप्ती सावंत, ॲड. वामन निर्गुण, ॲड. रत्नाकर गवस, ॲड. समीर वंजारी, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. विजय शंभरकर, ॲड. पूजा ओटवणेकर, ॲड. वर्षा गावकर, ॲड. प्रिया भावे, ॲड. मेघा परब, ॲड. बकले, लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य सौ. वेंगुर्लेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. सुखानंद सावंत, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर यांच्यासह वकील संघटनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. स्वप्निल कोरगावकर यांनी केले, तर आभार सावंतवाडी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.