नगरपरिषद व सिंधू रनर्सचा संयुक्त उपक्रम; ३, ६ व १२ तासांच्या गटांत महाराष्ट्र, गोवा व इतर राज्यांतील धावपटूंचा सहभाग
सावंतवाडी,दि.०३ ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषद व सिंधू रनर्स, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदरील स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रौ ८.०० वाजता ते दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत मोती तलाव परिसरात घेण्यात येणार असून या स्पर्धेचा शुभारंभ दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रौ ८.०० वाजता राजवाडा प्रवेशद्वार येथून होणार आहे. या स्पर्धेत ३ तास, ६ तास आणि १२ तास अशा तीन गटांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह, गोवा व इतर राज्यांतील धावपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा सौ श्रध्दा लखमराजे सावंत भोसले यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या फिटनेस संस्कृतीची, अल्ट्रा रनिंगबद्दल वाढलेल्या विश्वासाची आणि सिंधू रनर्सच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष आहे. आता ‘सावंतवाडी १२ तास रन’ ही महाराष्ट्रातील अल्ट्रा धावपटूंसाठी एक प्रतिष्ठेची स्पर्धा बनली आहे. सिंधू रनर्सने गेल्या काही वर्षांत सावंतवाडी १२ तास रन, शिवज्योत रन, गोवा-सावंतवाडी १०० कि.मी. इंटरसिटी रन तसेच सिंधू यंग चॅम्पियन्स किड्स रन यांसारखे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवून सिंधुदुर्गमध्ये धावण्याची चळवळ अधिक बळकट केली आहे. या उपक्रमांमधून प्रेरणा घेऊन अनेक धावपटूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्गचे नाव देशभर पोहोचवले आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ विजेते घडवणे नसून, धावणे हा आरोग्यदायी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे, तरुणांमध्ये फिटनेसची जागृती निर्माण करणे, तसेच शुध्द हवेसाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे अल्ट्रा रनिंगला चालना देणे आणि सिंधुदुर्गमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू घडवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
सावंतवाडी ‘१२ तास रन’ हा आज केवळ एक क्रीडा उपक्रम नसून, सिंधुदुर्गच्या क्रीडा संस्कृतीचा, जिद्दीचा आणि सामाजिक सहभागाचा प्रेरणादायी उत्सव बनला आहे. सिंधू रनर्स यांच्या वतीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रात्रभर धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन द्यावे आणि या अनोख्या क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद आणि सिंधु रनर्स, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे, असे नगराध्यक्षा सौ. श्रध्दा लखमराजे सावंत भोसले यांनी सांगितले.