सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात यापुढे विनापरवानगी बॅनर लावले जाणार नाहीत, याची प्रशासनाने कडक काळजी घ्यावी. बॅनर परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या जागीच लावले जातात की नाही याची पाहणी करावी, असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिले. तसेच आगामी गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विक्रेते व ग्राहकांच्या सुविधांसाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन धोरण ठरवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नगरपरिषदेची मासिक सभा नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
सभेत नगरसेवक तौकीर शेख यांनी शहरातील अनधिकृत बॅनरबाजीचा प्रश्न उपस्थित केला. स्वतः परवानगी घेऊनही आपल्याला आलेला वाईट अनुभव त्यांनी मांडला. यावर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून वस्तुस्थितीची खात्री करून घेतली.
दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या दृष्टीने शहरात येणारे विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक संजू परब यांनी केली. यावर विषय समिती सभापती आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर आणि सुधीर आडीवरेकर यांनी विशेष सभा घेऊन निर्णय घ्यावा, असा सूर उमटला. तर आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार नवीन भाजी मार्केटच्या इमारतीजवळ विक्रेत्यांची सोय करता येईल, असे नगरसेवक खेमराज कुडतरकर यांनी सांगितले.
या सर्व चर्चांवर बोलताना, सणाच्या काळात खरेदीसाठी येणारे नागरिक व विक्रेत्यांना त्रास होणार नाही अशा योग्य ठिकाणी व्यवस्था केली जाईल, यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.