सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित

शेअर करा

सावंतवाडी,दि.०४ ऑगस्ट
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४० महाविद्यालयांतील ५०० ते ६००हून विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक यांनी भोसले नॉलेज सिटी येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह उपस्थित होते.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्च्युत भोसले, अध्यक्ष सौ. अस्मिता भोसले, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. नितीन वळंजू उपस्थित राहणार आहेत.


या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला विभागांतील विविध स्पर्धा पार पडणार आहेत. गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज आणि मातीशिल्प अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.


मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा प्रतिष्ठेचा उपक्रम मानला जातो. विभागीय फेरीतील उत्कृष्ट स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.मुख्य स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० ते रात्री ९.३० या वेळेत पार पडतील. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त महाविद्यालयानी आपल्या विद्यार्थ्यांना या महोत्सवामध्ये सहभागी करावी असे आवाहन प्राचार्य बाणे यांनी केले आहे.


युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांचे मार्गदर्शन करत आहेत. महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या कार्यरत केल्या आहेत.

शेअर करा