उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांचे आवाहन
सावंतवाडी,दि.०५ जुन
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण जमिनीतील उपलब्ध अन्नघटक पिकांना मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे द्रावण घरच्या घरी बनवून वापरावे, ज्यामुळे त्यांच्या शेती उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अनिकेत कदम यांनी केले.
कृषी विभागातर्फे होडावडा येथील प्रगतशील शेतकरी श्री. मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये ‘गोकृपा अमृतम्’ हे जैविक द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमादरम्यान गोकृपा अमृतम् द्रावण तयार करण्याबरोबरच, बीज उगवण क्षमता वाढवणे आणि बीजप्रक्रिया कशी करावी याचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले. कृषी सहाय्यक श्री. पंकज पाटील यांनी गोकृपा अमृतम् द्रावणामध्ये प्रक्रिया केलेले बियाणे आणि प्रक्रिया न केलेले बियाणे यांच्यातील फरक प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना दाखवून दिला.
तसेच, मंडल कृषी अधिकारी श्री. शंकर नाईक यांनी बागेतील झाडांना जैविक आच्छादन (मल्चिंग) कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बागेतील नारळाच्या झाडाला जैविक आच्छादन करून त्याचे थेट प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले.
यावेळी बागेचे मालक श्री. मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या बागेत राबवल्या जाणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये रक्षक सापळे, कृत्रिम अंडी उबवणूक पेटी, बेडूक संवर्धन, गांडूळ खत आणि कल्की द्रावण यांसारख्या प्रयोगांचा समावेश होता.
माणगावकर यांच्या बागेत तयार करण्यात आलेले ‘गोकृपा अमृतम्’ द्रावण परिसरातील शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोफत वितरित करण्यात येणार आहे. तरी गावातील प्रत्येकाने हे विरजण (द्रावण) नेऊन आपापल्या घरी मोठ्या प्रमाणावर जैविक द्रावण तयार करावे आणि आपल्या शेतात तसेच बागेत वापरावे, असे आवाहन श्री. कदम यांनी केले.
या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक विविध शंकांचे कृषी अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमास होडावडा गावातील शेतकरी बांधव, महिला वर्ग आणि बहुसंख्य ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जैविक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.