सावंतवाडी: आसोली अंगणवाडी क्रमांक १ येथे स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम

शेअर करा

सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आसोली येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके व त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान रानभाज्यांचे पोषणमूल्य, त्यांपासून मिळणारे विविध पोषक घटक, रानभाज्यांपासून तयार होणारे पौष्टिक पदार्थ तसेच संतुलित आहार, माता व बालकांचे आरोग्य आणि स्तनपानाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अंगणवाडीमार्फत “शेत बांधावरची शाळा” आणि “रानभाज्या मेळावा” हे उपक्रमही राबविण्यात आले. या उपक्रमांना माता व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका सुरेखा गावडे, श्वेता धुरी, वीणा धुरी, अन्वी राणे तसेच मदतनीस भाग्यश्री आसोलकर, साक्षी धुरी, निकिता जाधव आणि अमिषा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

शेअर करा