वाचन संस्कृती रुजविण्यावर भर
सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोबर
जीवनात आकार देण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे असून, वाचन केल्याने मनावर चांगले संस्कार होतात. तसेच मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर वाचन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादकीय सहायक वर्षा देवरुखकर यांनी केले. ते नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे येथे आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलत होते.
माजी राष्ट्रापती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन, लेखन, मनन व मराठी विश्वकोशाचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांचा सत्कार विश्वकोश मंडळाचे सदस्य महादेव देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्रीदेवी सातेरी ग्रंथालयाच्या वतीने संस्थाध्यक्षांना शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्य वाचल्याने जीवनाला कलाटणी मिळते आणि त्यातूनच भविष्यात चांगले कवी, लेखक निर्माण होऊ शकतात, असे विचार आ. भि. राऊळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. तसेच पाठ्यपुस्तक आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचल्याने आपण प्रगल्भ होतो, असे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी सांगितले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त नववीतील विद्यार्थिनी जिज्ेक्षा कमलेश भैरे हिने काढलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘मला आवडलेले पुस्तक’ व ‘मला आवडलेले पाठ्यपुस्तक’ या विषयावर तालुकास्तरीय वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लहान गटातून १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
लहान गट: प्रथम क्रमांक – पूर्वा विजय गावडे (शाळा दाणोली बाजार), द्वितीय क्रमांक – श्रीकर मंदार शुक्ला (सावंतवाडी नं. ४), तृतीय क्रमांक – हर्ष आनंद रेडकर (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे). उत्तेजनार्थ – अन्वी अजित देशार (शिरशिंगे जि.प.नं. १), दीक्षा दत्ताराम सावंत (कुणकेरी नं. १).
मोठा गट: प्रथम क्रमांक – सायली संदीप आळवे (नेमळे विद्यालय), द्वितीय क्रमांक – लतिका हेमंत मेस्त्री (नेमळे विद्यालय), तृतीय क्रमांक – हाफिज सर्फराज आजगावकर (नेमळे विद्यालय). उत्तेजनार्थ – निमिश उमेश राऊळ व सोन्याक्षी बाजीराव दळवी (नेमळे विद्यालय).
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना पेन व खाऊ वाटण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण भरत गावडे, विठ्ठल कदम, मनोहर परब, स्मिता नाईक व अनिल कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार महादेव देसाई यांनी मानले. या कार्यक्रमास विश्वकोश सदस्या तथा ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, वामन पंडित, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाउसकर, सचिव पांडुरंग दळवी, प्राचार्य आर. के. राठोड, माजी प्राचार्या साधना तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.