सावंतवाडी,दि.१४ ऑगस्ट
सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभेत आरोग्य, शिक्षण, बांधकाम आणि रोजगार या प्रश्नावर गाजली. आरोग्य विषयक मूलभूत सुविधा, मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल साठी सरकारकडे पैसे नसतील तर भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा देताच सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी राजघराण्यातील दोन्ही बाजूंनी न्यायालयात भूमिका मांडली आहे त्यामुळे येत्या २० ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होईल असे सांगितले.
सावंतवाडी तालुक्याची आमसभा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ९ वर्षांनी नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. या सभेत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणि प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा विषय प्रामुख्याने चर्चेत राहिला. बैठकीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीवरून वक्तव्य करताना भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
सभेच्या सुरुवातीला आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची अपुरी संख्या आणि रुग्णांना गोव्याला रेफर केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारकडून निधी मिळत नसल्यास ‘भीक मागो’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर शिंदे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नारायण राणे यांनी ‘भीक मागो’ हा शब्द मागे घेण्याची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आणि आमदार केसरकर यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक पटकावल्याचे सांगत रिक्त पदे लवकरच भरली जातील, असे स्पष्ट केले. तसेच आरोग्याच्या प्रश्नांवर लवकरच स्वतंत्र विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी ८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच जागेचा प्रश्न सुटून काम मार्गी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही गोव्याला रेफर केले जात असल्याच्या तक्रारीवर आमदार केसरकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना अशा रुग्णांकडे वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुष्मिता जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,अधिकारी उपस्थित होते.