​सावंतवाडी : दाणोली बाजारात वीज कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांकडून सन्मान; चहा-बिस्किटांचे वाटप

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१० जुलै


दाणोली बाजारपेठ परिसरात नवीन लाईट पोल (वीज खांब) उभे करण्याचे काम करणाऱ्या कामगारांसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत चहा-बिस्किटांची सोय करत अनोखा जिव्हाळा दाखवला. कष्टाचे काम करणाऱ्या या कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.


​बाजारपेठेत वीज पुरवठा सुरळीत व मजबूत करण्यासाठी नवीन पोल उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम करणाऱ्या कामगारांचे श्रम ओळखून दाणोलीतील समाजसेवक श्री. संदीप सूर्यकांत सुकी, देवसू ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज परब, स्थानिक ग्रामस्थ समीर शिंदे आणि प्रकाश सावंत यांनी पुढाकार घेतला. या सर्वांनी मिळून कामाच्या ठिकाणीच कामगारांसाठी चहा आणि बिस्किटांची उत्तम सोय केली.


​स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या या आपुलकीबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल वीज कामगारांनीही विशेष आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या या छोट्याशा पण संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा