सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या भविष्यातील पाण्यासाठी आताच जागे व्हा!

शेअर करा

मारेमर्यादा ओलांडणारी जंगलतोड अन् बेसुमार प्लॉटिंगमुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे गडद सावट; नाणोसचे ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांचा प्रशासनाला इशारा

सावंतवाडी दि.२८ सप्टेंबर
निसर्गसंपन्न अशी ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीसमोर आज मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली बेसुमार जंगलतोड, डोंगर उतारांवरील विकासकामे, जमिनीचे बेसुमार प्लॉटिंग आणि निसर्गाची होत असलेली लूट थांबली नाही, तर उद्याचा सिंधुदुर्ग पाण्यासाठी तहानलेला असेल, असा गंभीर इशारा नाणोसचे ग्रामपंचायत सदस्य सागर सोमकांत नाणोसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
​आज आपण जमिनीचे तुकडे करून विक्री करत आहोत; पण उद्या त्या जमिनीवर राहणाऱ्या माणसांसाठी पाणी कुठून आणणार? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील जंगल, डोंगर, झरे, नाले आणि पारंपरिक पाणवठे ही पुढच्या पिढीची जीवनरेखा आहे. जमिनीचे वाढते काँक्रीटीकरण भूजल पुनर्भरणावर मोठा परिणाम करत असून, आज पाणी उपलब्ध आहे म्हणून उद्याही ते राहील या गैरसमजात राहणे धोकादायक असल्याचे नाणोसकर यांनी नमूद केले.
​प्लॉटिंग करा, पण पाण्याचा विनाश करून नाही!
बाहेरील नागरिकांकडून होणाऱ्या जमीन खरेदी आणि प्लॉटिंगच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण केंद्रस्थानी असले पाहिजे. विकासाला विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली निसर्ग उद्ध्वस्त करण्याला आमचा निश्चितच विरोध आहे. ज्या परिसरात प्लॉटिंग होत आहे, तेथील भूजलसाठे उद्या किती लोकांची तहान भागवणार? याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
​प्रशासनाने तात्काळ कठोर भूमिका घ्यावी:
​पर्यावरण प्रभाव तपासणी: संवेदनशील भागात मोठ्या प्लॉटिंगपूर्वी जलस्रोत व पर्यावरणावरील परिणामांची तपासणी व्हावी.
​जलस्रोतांचे संरक्षण: नैसर्गिक नाले, ओढे, झरे बुजवण्यास पूर्णतः बंदी घालावी आणि पारंपरिक पाणवठ्यांचे जतन करावे.
​कडक कारवाई: अनधिकृत जंगलतोड, डोंगर उतारांचे अनावश्यक सपाटीकरण व उत्खननावर कठोर नियंत्रण आणावे.
​जलनियोजन व हार्वेस्टिंग: पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे करून प्रत्येक गावाचे दीर्घकालीन जलनियोजन करावे.
​”जमीन आज विकता येईल, पण पाणी विकत घेता येणार नाही. जंगल तोडता येईल, पण पुन्हा निर्माण करण्यासाठी पिढ्या लागतील,” अशी स्पष्ट आठवण करून देत हा प्रश्न केवळ नाणोसपुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याचा आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निसर्ग संरक्षणासाठी आताच ठोस पावले उचलावीत, अन्यथा उद्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा सागर नाणोसकर यांनी दिला आहे.

शेअर करा