सावंतवाडी, दि.१२ जून
सावंतवाडी येथील ‘ग्रो बीग टेक्नॉलॉजी’ या आऊटसोर्सिंग कंपनीच्या जागेवरून आणि भाड्याच्या दरावरून कंपनीचे संचालक मायकल डिसोजा आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम-सावंत-भोसले यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. नगरपरिषदेकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आणि टक्केवारी मागितली जात असल्याचा गंभीर आरोप संचालकांनी केला आहे, तर प्रत्यक्षात मंजूर जागेपेक्षा जास्त जागा वापरली जात असल्याचे पाहणीत आढळून आले आहे असे नगराध्यक्षांनी बोलताना सांगितले.
सावंतवाडी शहरात ‘ग्रो बीग टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून भारतातील नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांचे आऊटसोर्सिंगचे काम सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० तरुणांना रोजगार मिळाला असून, भविष्यात आणखी २५० मुलांना नोकरी देण्याचा मानस आहे. एकूण १ हजार मुलांना रोजगार देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून, नुकतेच बजाज कंपनीकडून ५० जागांचे अप्रूव्हलही मिळाले आहे. मात्र, सध्या या केंद्राला जागेअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यावरून आता राजकीय आणि प्रशासकीय वाद उफाळून आला आहे.
अमेरिकेपेक्षाही जास्त भाडे आणि कमिशनची मागणी: मायकल डिसोजा
कंपनीचे संचालक जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “इथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही नगरपरिषदेच्या एका रिक्त जागेत संधी मागितली होती. प्रभारी नगराध्यक्ष असताना ॲड. अनिल निरवडेकर यांनी कमीतकमी भाडेतत्त्वावर जागा देण्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर नगराध्यक्षा आल्या आणि त्यांनी २०० स्क्वेअर फूट जागेसाठी चक्क १५ दिवसांचे १ लाख ८० हजार रुपये आणि एका महिन्यासाठी ३ लाख ६० हजार रुपये भाडे सांगितले. आम्हाला गरज असल्याने आम्ही १५ दिवसांचे ५९ हजार रुपये भरले आहेत, पण हे दर देशात कुठेही नसून थेट अमेरिकेतल्या दरासारखे आहेत,” असा संताप डिसोजा यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी थेट टक्केवारीचा आरोप केला. “त्यांचे सगळे लक्ष फक्त टक्केवारीवर (कमिशन) आहे. आमच्याकडूनही त्यांची तीच अपेक्षा होती. ‘इथे भेटा, युवराजांना भेटा’ असे आम्हाला सांगण्यात आले. ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले, त्यांनीच आज आमच्यावर ही वेळ आणली आहे. आज नगराध्यक्षांनी सेंटरला भेट देऊन ‘मुले इथले टॉईलेट कसे वापरतात?’ अशी विचारणा करत हुज्जत घातली. ६० मुले आत काम करत असताना केंद्र कुलूपबंद (लॉक) करण्याचा इशारा दिला गेला. याच इमारतीत गेल्या ६ वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचे केंद्र विनामूल्य सुरू आहे, मग आमच्याकडूनच एवढे अवाजवी भाडे का?” असा सवाल त्यांनी केला.जर आम्हाला यापुढे त्रास दिला, तर शहरात होर्डिंग्ज लावून त्यांचा भांडाफोड करू. हे आरोप खोटे असतील तर त्यांनी ग्रामदैवत देव पाटेकरांसमोर यावे.” या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी कंपनीचे दुसरे संचालक सुशांत पास्ते उपस्थित होते.
चौकट
केवळ जागेची उपलब्धता पाहण्यासाठी गेले होते: नगराध्यक्षा श्रद्धा सावंत
या सर्व आरोपांवर नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम-सावंत-भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. उगाच काहीतरी आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले म्हणाल्या, “आज मी आणि पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर संबंधित इमारतीत गेलो होतो. नगरपरिषदेकडून त्यांना केवळ एका रूमची जागा भाडेतत्त्वावर मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्यांनी दोन रूम्सचा वापर केल्याचे दिसून आले. या बेकायदेशीर वापराबाबत जेव्हा आम्ही तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा ते काहीही बोलू शकले नाहीत. तसेच मायकल डिसोजा यांनीही मुख्य मुद्दा सोडून इतर गोष्टींवर बोलणे पसंत केले.”
”बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला अकादमी ही इमारत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आहे. दशावतार कला वगैरे साठी जागा उपलब्ध होईल का हे पाहण्यासाठी गेलो होतो.त्यामुळे तिथे नेमकी किती जागा वापरली जात आहे आणि जागेची उपलब्धता काय आहे, याची पाहणी करण्यासाठीच मी तिथे गेले होते,” असा खुलासा नगराध्यक्षांनी केला. तसेच भाडे आकारणी आणि अन्य काही प्रशासकीय अधिकारी निर्णय घेतात त्याबाबत आमच्या बाबतीत गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत मी सविस्तर बोलेन असे त्यांनी सांगितले.