सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत; पाळणेकोंड धरणात ०.७३ Mcm पाणीसाठा शिल्लक

शेअर करा

सावंतवाडी,दि.२९ सप्टेंबर
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरण आणि केसरी झऱ्यांमधून सद्यस्थितीत शहराचा पाणीपुरवठा अत्यंत सुरळीत सुरू असल्याची माहिती सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
​नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी शहराची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर आधारित आहे. पाळणेकोंड धरण आणि केसरी झरे या दोन्ही स्रोतांचा वापर करून शहरात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत नियोजनबद्ध रीतीने पाणी वाटप केले जाते.
​यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास पाळणेकोंड धरण पूर्ण भरून ओव्हर-फ्लो झाले होते. धरण ओव्हर-फ्लो झाल्यानंतर त्यातील साचलेला गाळ, माती व अशुद्धता बाहेर काढण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी नियोजित पद्धतीने धरणाचा ‘मेन वॉश आऊट वॉल्व्ह’ उघडण्यात आला होता. याबाबतची पूर्वकल्पना नजीकच्या कुणकेरी ग्रामपंचायतीला देण्यात आली होती. आवश्यक ती स्वच्छता केल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी हा वॉल्व्ह पुन्हा बंद करण्यात आला आहे.
पाळणेकोंड धरणाची एकूण साठवण क्षमता ०.७६ Mcm (१८ मीटर) आहे. सध्या धरणात ०.७३ Mcm (१६ मीटर) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील काही वर्षांच्या सरासरीचा विचार करता यावर्षी धरणात ०.०३ Mcm (२ मीटर) पाणीसाठा कमी आहे.
​तथापि, सध्या डोंगराळ भागातून पाळणेकोंड धरणात येणारे पावसाचे झरे आणि केसरी झऱ्यातील पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नागरिकांनी पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा