​सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध: नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले

शेअर करा


​नळपाणी योजनेच्या चौकशी आणि ‘थर्ड पार्टी ऑडिट’च्या निर्णयाचे स्वागत; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणार

​सावंतवाडी, दि. १० जुलै

“सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्ही सर्व जण कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी दिली आहे. नगरपरिषद नळपाणी योजनेच्या कामाची चौकशी आणि थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला असून, आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
​याप्रसंगी नियोजन सभापती आनंद नेवगी, सभापती दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, सभापती प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले, सिद्धार्थ भांबुरे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होत


​नळपाणी योजनेचे ५०% काम पूर्ण; चौकशीनंतरच पुढील निर्णय:
​नगराध्यक्षा म्हणाल्या की, सावंतवाडी नळपाणी योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, या योजनेच्या कामाबाबत काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट’मार्फत चौकशी आणि ‘थर्ड पार्टी ऑडिट’ (तपशीलवार तटस्थ मूल्यमापन) करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे सध्या ५0 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम करण्याबाबतचा निर्णय हा चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल. आम्ही स्वतः या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेवर बारीक लक्ष ठेवून आहोत.
​इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांचे गेल्या ६ वर्षांपासूनचे भाडे थकीत आहे. हे थकीत भाडे आणि प्रीमियम पूर्वी ठरल्याप्रमाणेच वसूल करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. यानंतर भाडेवाढीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच, जर मूळ गाळेधारकांनी आपले गाळे इतरांना भाड्याने दिले असतील किंवा या संकुलाबाबत काही इतर तक्रारी असतील, तर त्यात प्रशासन नक्कीच लक्ष घालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


​दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोकणार:

“शहराचा विकास जलद गतीने व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करत आहोत. काही ठेकेदारांनी कामे घेऊनही ती वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, यापुढे कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असा इशारा नगराध्यक्षांनी दिला.
​नगरसेवकांना विश्वासात न घेता बिले काढल्यास चौकशी होणार:
​नगरपरिषदेच्या बैठकीत विरोधकांनी “काम अपूर्ण असताना बिल काढले गेले किंवा काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊनही चेक दिले गेले नाहीत” असा गंभीर विषय मांडला होता. यावर बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या, “या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी बैठकीतच दिले आहेत. एखाद्या प्रभागात सुरू असलेले काम दर्जेदार झाले आहे की नाही, हे पाहणे आणि संबंधित स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेऊनच अधिकाऱ्यांनी बिल अदा करणे किंवा काम पूर्ण झाल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे. तसे न करता जर काही अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेतले असतील, तर त्याची कसून चौकशी केली जाईल.”


​शेवटी, “सावंतवाडी शहराचा विकास आणि येथे होणाऱ्या कामांची जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून माझी आणि प्रत्येक नगरसेवकाची आहे. कामे दर्जेदार व्हावीत यासाठीच आम्हाला लक्ष घालावे लागते आणि शहराचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय आहे,” असे सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांनी ठामपणे सांगितले.

शेअर करा