​सावंतवाडी : आजगाव सह आठ गावातील ग्रामसभेचा ठराव धुडकावून ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्यांना अटक का नाही? – डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

शेअर करा


​पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प कोकणातच का? एखादा नागपूरला घेऊन जा!
​आम्हाला काळी मांजर म्हणत असाल, तर आम्ही ‘ब्लॅक कॅट कमांडो’ आहोत.


​सावंतवाडी,दि.१६ जून
आजगावसह परिसरातील आठ गावांतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि ग्रामसभेचे स्पष्ट ठराव असतानाही, ते धुडकावून ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्यांवर प्रशासनाने अद्याप अटकेची कारवाई का केली नाही? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. “पर्यावरण हितासाठी लढणाऱ्यांना जर ‘काळी मांजर’ म्हटलं जात असेल, तर आम्ही ‘ब्लॅक कॅट कमांडो’ प्रमाणे काम करू. सर्व पर्यावरणास हानी पोहोचवणारे प्रकल्प कोकणातच का आणले जातात? एखादा प्रकल्प नागपूरला घेऊन जा,” असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
​”जमिनीची सोनोग्राफी आणि प्रशासकीय मेहेरबानी”:
​आजगाव परिसरावर सध्या मायनिंगचे संकट घोंगावत असल्याचा आरोप करत डॉ. परुळेकर म्हणाले की, “तिथे झालेल्या ड्रोन सर्वेक्षणात कॅमेरे नव्हते तर सेन्सर होते, म्हणजेच एकप्रकारे जमिनीची सोनोग्राफीच सुरू होती. जनतेचा तीव्र विरोध असताना या सर्वेक्षणाला परवानगी कशी मिळाली? जर हे सर्वेक्षण खाजगी कंपनी करणार असेल, तर महसूल प्रशासन कशासाठी आहे? प्रशासनाने खाजगी कंपन्यांचे एजंट म्हणून काम न करता जनतेसाठी काम करावे.” वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणणारे प्रकल्प कोकणात लादले जात असून, जिल्ह्यातील अवैध मायनिंगकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
​मोती तलावाचे सुशोभीकरण की विद्रुपीकरण?
​सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाच्या सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, “जी सावंतवाडी नैसर्गिकरीत्याच सुंदर आहे, तिचे सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण सुरू आहे. यामध्ये तलावाचा काही भाग बुजवण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका येते. शहरातील फुटपाथचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्ते खचले आहेत. यात कुठे रिक्षा अडकतेय तर कुठे नागरिक पडत आहेत. हा विकास जनतेसाठी आहे का असा प्रश्न उपस्थित केला.पालकमंत्री यांनी सांगितलेली ‘मोठी रेघ’ ही भ्रष्टाचाराची ओढायची आहे का?” असा घणाघात त्यांनी केला. शहरातील रस्त्यांची आणि साईडपट्टीची दुरवस्था पाहता, भविष्यात कोणाचा जीव गेल्यास मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा, असा प्रश्न त्यांनी विचारला.
​राजघराण्याने भान विसरू नये!
​सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देत डॉ. परुळेकर म्हणाले, “पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, शिवरामराजे आणि राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी या परिसराचा गौरव वाढवला. जेव्हा जगात दिवाबत्ती होती, तेव्हा सावंतवाडीत वीज, उत्तम रस्ते आणि रुग्णालये होती. या राजघराण्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे; मात्र आताच्या पिढीला या वारशाचा विसर पडला आहे का? लोकप्रतिनिधी हे नगरपरिषदेचे विश्वस्त आहेत, याचे भान त्यांनी विसरू नये.” असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.

शेअर करा