सावंतवाडी,दि.२१ सप्टेंबर
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे एका २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माडखोल (धवडकी बेबीवाडी) येथे घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनिकेत सतीश पाटील (वय २६, रा. कापूरखेड, ता. वाळवा, जि. सांगली) या तरुणाने फिर्यादी यांची मुलगी आश्लेषा हिला लग्नाचे आमिष दाखवले होते. या आमिषापोटी त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला.
याच मनस्तापातून आणि मानसिक तणावातून तरुणीने माडखोल येथील तिच्या राहत्या भाड्याच्या घरी सीलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केल्यानंतर या घटनेचा संशय आपल्यावर येऊ नये आणि आपल्याला जबाबदार धरले जाऊ नये, म्हणून संशयित आरोपी सनिकेत याने कोणालाही काही न सांगता तिला गळफासावरून एकट्याने खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले होते.
याप्रकरणी मुलीचे वडील सागर भीमराव मांगले (वय ५१, रा. लाकूडवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) २०२३ च्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची नोंद २१ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक करत असून, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. संशयित आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.