श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८९ वी पुण्यतिथी साजरी; ‘खेमराजीय’ अंकाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सावंतवाडी, दि. ४ जुलै
“आजचे युग हे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आहे. सोशल मीडिया आणि रिल्सच्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी आभासी जगात वावरत असून पुस्तकांपासून दूर चालली आहे. आभासी आणि वास्तविक जगात जमीन-अस्मानाचा फरक असून, तरुणांनी या आभासी जगातून बाहेर पडून वास्तवाचे भान ठेवणे आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे ही काळाची गरज आहे,” असे परखड प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयात (स्वायत्त) सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले होते.
व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. सुरुवातीला बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अमली पदार्थ हे विष, त्याची परीक्षा नको: डॉ. दहिकर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी वाढत्या अमली पदार्थांच्या सेवनावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. परंतु अमली पदार्थ हे विष आहे आणि विषाची परीक्षा कधीही घ्यायची नसते, हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. चरित्र, शिस्त, स्फूर्ती आणि चैतन्याचा पाया मजबूत करून विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळवावे.”
बापूसाहेब महाराजांचा दूरदर्शीपणा मोलाचा: श्रीमंत खेमसावंत भोंसले
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. बापूसाहेब महाराजांनी अत्यंत अल्पकाळात सावंतवाडी संस्थानाचा जो विकास केला, त्याच्या खुणा आजही पाहायला मिळतात. त्यांचा हाच दूरदर्शीपणाचा आदर्श आजच्या तरुण पिढीने समोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. माधव भिसे यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा जीवन परिचय करून देताना सांगितले की, महात्मा गांधींनी बापूसाहेबांना ‘रामराजा’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ‘न्यायनितीज्ञ राजा’ असे संबोधले होते.
’खेमराजीय’ अंकाचे प्रकाशन व गुणवंतांचा सत्कार
याप्रसंगी महाविद्यालयाच्या ‘खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बारावी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मधुरा मिलिंद सावंत (कला – ८३%), मृणाली दिलीप कालेलकर (वाणिज्य – ८०%) आणि शिवम अनिल मगदूम (विज्ञान – ८४%) यांनी आपापल्या शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भूगोल विषयात ९६ गुण मिळवल्याबद्दल गायत्री वराडकर हिचा विशेष सत्कार झाला.
या कार्यक्रमाला संस्थानप्रेमी नागरिक अण्णा केसरकर, प्रा. अन्वर खान, मधुकर देसाई, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. पूनम सावंत यांनी केले, तर आभार प्रा. यु. आर. पवार यांनी मानले.