गोव्यातील राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये अचूक लक्ष्यभेद; अवनीला ‘मास्टर शूटर’चा बहुमान
सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर
गोवा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सावंतवाडीच्या कु. अवनी भांगले हिने लक्ष्याचा अचूक वेध घेत तब्बल चार सुवर्णपदके पटकावत स्पर्धेतील मास्टर शूटरचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत एकाचवेळी चार सुवर्णपदके पटकावत तिने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. यापूर्वी देखील अवनीने राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष चमक दाखविली होती. मात्र यावेळचे तिचे हे प्रदर्शन क्रीडाप्रेमींसाठी थक्क करणारे ठरले.
कु. अवनी ही आंतरराष्ट्रीय शूटिंग प्रशिक्षक आणि पंच तसेच नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष अॅड. विक्रम भांगले यांची कन्या. अवनी हिने १० मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. तसेच २५ मीटर स्टैंडर्ड पिस्टल इव्हेंट आणि २५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल इव्हेंटमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवत तिने आपल्या यशात भर घातली आहे.
विशेष म्हणजे २५ मीटर स्टैंडर्ड पिस्टल आणि २५ मीटर स्पोर्टस् पिस्टल हे फायर आर्म्स प्रकारातील अत्यंत कौशल्यपूर्ण आणि आव्हानात्मक नेमबाजीचे प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक मिळवून अवनीने आपल्या नेमबाजीतील अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासाची प्रभावी झलक दाखवून दिली आहे.
या शानदार कामगिरीची दखल घेत अवनीला १० मीटर पिस्टल तसेच २५ मीटर पिस्टल या दोन्ही प्रकारांत ‘मास्टर शूटर’ हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल. तिला दोन ट्रॉफी आणि रोख पारितोषिकानेही गौरविण्यात आले.
अवनीच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव, शिस्त आणि नेमबाजीतील एकाग्रता महत्त्वाची ठरली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत चार सुवर्णपदके आणि ‘मास्टर शूटर’चा बहुमान मिळवणारी तिची कामगिरी निश्चितच अभिमानास्पद असून तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.