पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले निर्देश ; देवगड–निपाणी,विजयदुर्ग–कासार्डे मार्गांवरील वृक्षारोपणाच्या कामांचा आढावा
सिंधुदुर्ग, दि.०८ जून
देवगड–निपाणी (६२ कि.मी.) आणि विजयदुर्ग–कासार्डे (५० कि.मी.) या प्रमुख मार्गांवरील वृक्षारोपणाच्या कामांचा आढावा मंत्रालयातील पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला.
यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना परिसर अधिक आकर्षक, नयनरम्य आणि पर्यटनाला पूरक दिसावा यासाठी रंगीबेरंगी फुलझाडांच्या लागवडीवर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
यासाठी गुलमोहर, कांचन, ताम्हण, आकाश शेवगा, जांभूळ, साग, शिसम आणि एशियन चेरी यांसारख्या विविध वृक्षप्रजातींची लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले. वृक्षारोपण केलेली झाडे दीर्घकाळ टिकून राहावीत यासाठी प्रभावी नियोजन, स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुरूप प्रजातींची निवड तसेच झाडांच्या संगोपनासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने रस्त्यांच्या दुतर्फा हरित पट्टा निर्माण करून परिसराचे सौंदर्य वाढविणे, पर्यावरण संवर्धनाला चालना देणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारचे वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या .
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, विभागीय वन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश बागुल तसेच संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.