सिंधुदुर्ग : आरोस-दांडेली परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

शेअर करा

शेतकऱ्यांचे नुकसान:- झाडे, बागायती झाल्या जमीनदोस्त

सिंधुदुर्ग,दि.०५ जुलै

आरोस-दांडेली परिसरात रविवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कै. भाऊ पांगम सभागृहाच्या इमारतीवरही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. इमारतीसमोर असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची रात्रीच्या वेळी भलीमोठी फांदी तुटून थेट सभागृहासमोर कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

तसेच दांडेली (नेमलेवाडी)येथील शेतकरी अमोल पुनाळेकर आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना,बागायतदारांना सुद्धा या वादळाचा तडाखा बसून त्यांची सुपारी झाडे, आंबा, केळी, साग,फणस,फळझाडे या वादळामुळे जमीन दोस्त होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारांचेही नुकसान झाले आहे.

वादळी पावसामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

वेंगुर्ले,दि.०५ जुलै

तालुक्यात गेले २ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळपासून पडत असलेल्या या पावसामुळे नागरिकांचे सुमारे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच समुद्राला सुद्धा उधाण आले असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभाग व वेंगुर्ला तहसील कार्यालय आपत्ती विभागाकडून देण्यात आले आहे.

शेअर करा