सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली

शेअर करा

उमेदवारांना २५ सप्टेंबरपर्यंत संधी; ७० टक्के जागा सिंधुदुर्गातील उमेदवारांसाठी

सिंधुदुर्ग,दि.१७ सप्टेंबर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने टीसीएस (TCS) कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी १७ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. आता उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींना या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भरती प्रक्रियेत शासनाच्या निर्देशांनुसार ७० टक्के जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी पात्र उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागांसाठी इतर पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना बँकिंग क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, मुदतवाढीचा लाभ घेत अधिकाधिक उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

शेअर करा