सिंधुदुर्ग,दि.०४ ऑगस्ट
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर उपस्थित होते.
सचिन अडसूळ यांनी यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य केले. त्याआधी त्यांनी गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील प्रभावी नियोजन, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार, प्रसारमाध्यमांशी सुसंवाद तसेच सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सचिन अडसूळ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) निवड झालेल्या सन २०१९ च्या बॅचमधील वर्ग-१ अधिकारी आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद, पुणे येथे सुमारे १२ वर्षे विविध पदांवर सेवा बजावली आहे.
त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाले असून त्यांचा मूळ जिल्हा सातारा आहे. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव, जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यास आणि माध्यमांशी असलेला प्रभावी समन्वय या बळावर त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक परिणामकारकपणे पोहोचविणे, प्रसारमाध्यमांशी समन्वय अधिक बळकट करणे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.