सिंधुदुर्ग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कार्यक्रम संपन्न

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१० सप्टेंबर

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने दिनांक ०९.०९.२०२६ रोजी श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे ‘बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम २०१२’ (POCSO Act) या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पॅनल विधीज्ञ ॲड. आशपाक शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस. डी. गिरकर तसेच विद्यालयाचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. आशपाक शेख यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण या कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या कायद्यामध्ये बालकांचे (मुली/मुले) लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्याकरिता तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. बालकांची लैंगिक छळवणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार यांसारख्या गंभीर बाबींपासून त्यांचे संरक्षण व्हावे, याच उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आला आहे. पॉक्सो कायदा सर्व मुलांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी जाणून घेतलाच पाहिजे. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर पालक आणि शिक्षकांनीही सजग राहणे तितकेच गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित स्पर्श’ (Good Touch) आणि ‘असुरक्षित स्पर्श’ (Bad Touch) यांमधील फरक समजावून सांगितला. आपल्यासोबत काही चुकीचे अथवा गैर घडल्यास विद्यार्थ्यांनी न घाबरता आपल्या जवळच्या विश्वासातील व्यक्तींना त्वरित सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय त्यांनी नागरिकांची मूलभूत तत्त्वे तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या विविध मोफत सेवा व सहाय्य याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा