Sindhudurg : माजी सैनिकास सदनिका खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

शेअर करा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत धनादेशाचे वितरण

सिंधुदुर्ग,दि.१३ ऑक्टोंबर

सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, दिव्यांग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये व अवलंबित यांना कल्याणकारी निधीतून विविध योजनांअंतर्गत शैक्षणिक मदत आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.
या योजनेंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील पारपोली येथील माजी सैनिक राजेश भिसाजी परब यांना सदनिका खरेदीसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पात्र शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, दिव्यांग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये व अवलंबित यांनी शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

शेअर करा