सिंधुदुर्गात प्रथमच: ग्रॅण्ड मास्टर लामाफेरा हिलर भर्तरीनाथ मुळीक यांना ‘बेस्ट हिलर सन्मान’ जाहीर!

शेअर करा

सावंतवाडी दि.३० जून


​ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद वृत्त असून, जिल्ह्यातील प्रसिद्ध ग्रॅण्ड मास्टर लामाफेरा हिलर भर्तरीनाथ मुळीक यांना त्यांच्या आध्यात्मिक व हिलींग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘बेस्ट हिलर सन्मान’ देऊन गौरविण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा सर्वोच्च बहुमान मिळवणारे ते पहिलेच लामाफेरा हिलर ठरले आहेत.
​ पुणे महानगर येथे आयोजित दोन दिवसीय भव्य ‘लामाफेरा हीलिंग वर्कशॉप’ (कार्यशाळा) दरम्यान या पुरस्काराची घोषणा करून त्यांना सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ‘ट्रेनर लॉन्चिंग हब’चे सी.ई.ओ. आणि प्रसिद्ध बिझनेस कोच श्री. नरेश वानखेडे तसेच लामाफेरा ग्रॅण्ड मास्टर श्रीमती अजिता सुर्वे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
भर्तरीनाथ मुळीक यांनी लामाफेरा हीलिंगच्या माध्यमातून असंख्य लोकांना मानसिक त्रासांतून मुक्त होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, त्यांना मानसिक व भावनिक संतुलन राखण्यास मदत करणे, तसेच समाजमनाला सत्य, पवित्रता आणि सकारात्मक विचारांच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
​या गौरव सोहळ्याप्रसंगी देश-विदेशातून आलेले अनेक नामांकित हिलर्स आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वच स्तरातून मुळीक यांच्या सेवाभावी कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
​’अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणे हेच ध्येय’
या अभूतपूर्व सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ग्रॅण्ड मास्टर भर्तरीनाथ मुळीक म्हणाले की, “हा सन्मान म्हणजे माझ्यावर असणाऱ्या विश्वासाची पावती आहे. लामाफेरा हीलिंग या प्राचीन आणि अत्यंत प्रभावी पद्धतीच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक लोकांच्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करून त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आणि त्यांचे जीवन आनंदी बनवणे, हेच माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.”

शेअर करा