सिंधुदुर्ग,दि.०९ सप्टेंबर
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी श्री. भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड येथे बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम, 2012 या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पॅनल विधीज्ञ ॲड. आशपाक शेख, अधीक्षक एस. डी. गिरकर तसेच शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी ॲड. आशपाक शेख यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक गुन्हापासून संरक्षण कायद्याची माहिती देताना बालकांना लैंगिक अपराध, छळ, छेडछाड, अश्लीलता, अत्याचार व बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी या कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. पोक्सो कायद्याची माहिती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जाणून घेणे आवश्यक असून, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याबरोबरच पालक व शिक्षकांनी सजग राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगितला. आपल्यासोबत चुकीचे काही घडल्यास ते विश्वासातील जवळच्या व्यक्तीला तातडीने सांगावे, तसेच नागरिकांची मूलभूत तत्त्वे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विधी सेवा व सहाय्याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.