सिंधुदुर्ग : दशावतार कलाकारांना ओळखपत्र दिले जाणार – मंत्री आशिष शेलार

शेअर करा

आ.प्रमोद जठार यांच्या उपस्थितीमध्ये दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी झाली बैठक

सिंधुदुर्ग,दि. १० जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी मंत्रालय येथे मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात प्रमोद जठार यांनी दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत निवेदन सादर केले. दशावतार कलाकारांना शासनाचे ओळखपत्र दिले जाणार असल्याचे मंत्री शेलार यांनी जाहीर केले.


बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित सचिव तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान दशावतार कलेच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. आम. प्रमोद जठार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंत्र्यांनी संबंधित विभागांना मागण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामध्ये आता दशावतार कलाकारांना शासनाकडून अधिकृत ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग दशावतार महोत्सव आयोजित करण्यात यावा. दशावतार कलेच्या जतन व प्रसारासाठी जास्तीत जास्त कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. दशावतार कलेचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत बालभारती यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. दशावतार कलाकारांची अधिकृत दूरध्वनी निर्देशिका तयार करण्यात यावी. या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या असून बैठकीत दशावतार ही केवळ लोककला नसून कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले. कलाकारांचे प्रश्न सोडवून या पारंपारिक कलेला राज्यस्तरावर अधिक बळ देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. आम. प्रमोद जठार यांनी यावेळी संपूर्ण दशावतार कलाकारवासियांच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा