सिंधुदुर्ग : आंबा-काजू पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ७,३१० शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हा बँकेकडून १.९० कोटी व्याज सवलत – मनीष दळवी

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१७ जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आंबा व काजू पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत २ टक्के व्याज सवलतीपोटी एकूण ₹१ कोटी ९० लाख रक्कम ७,३१० शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली आहे. या निर्णयामुळे शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सन २०२५-२६ मध्ये अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार आणि दव यांसारख्या प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. बागायतीवरील उत्पादन खर्चही वसूल न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा बँकेने विकास संस्थांमार्फत तसेच थेट पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरात २ टक्के व्याज सवलत (रिबेट) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार ३० जून २०२६ अखेर नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ही सवलत देण्यात आली असून, त्यांची रक्कम थेट त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आली आहे.

ही आर्थिक मदत बँकेने स्वतःच्या नफ्यातून दिली असल्याचे सांगताना अध्यक्ष मनीष दळवी यांनी, “शेती हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज सवलतीची रक्कम जमा झाल्याने त्यांना शेतीच्या विविध कामांसाठी आर्थिक मदत मिळेल आणि त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मनीष दळवी यांनी व्यक्त केला.

शेअर करा