सिंधुदुर्गच्या जलवाहतूक विकासासाठी गोव्यातील ‘रो-रो’ सेवेचा मंत्री नितेश राणेंनी घेतला प्रत्यक्ष अनुभव

शेअर करा

खाड्या, नद्या आणि समुद्रसंपदेचा नियोजनबद्ध वापर करून जलमार्ग विकसित करण्याचा संकल्प

सिंधुदुर्ग,दि.१० सप्टेंबर

सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणातील खाड्या, नद्या आणि समुद्रसंपदेचा प्रभावी व नियोजनबद्ध वापर करून जलवाहतुकीचे नवे मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने गोव्यातील जलवाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला. गोव्यातील चोडना ते रायबंदर या जलमार्गावर प्रवासी तसेच वाहनांची वाहतूक करणाऱ्या ‘रो-रो’ फेरीबोटीने प्रत्यक्ष प्रवास करून जलवाहतुकीच्या या व्यवस्थेची माहिती घेतली.

गोव्यातील जलवाहतुकीचा हा अनुभव सिंधुदुर्गासह महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवरील जलवाहतूक विकासासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा, अनेक खाड्या आणि नद्यांचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. या जलसंपदेचा योग्य नियोजनाने वापर केल्यास जिल्ह्यात जलवाहतुकीचे सक्षम पर्यायी मार्ग निर्माण होऊ शकतात,असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

रस्ते वाहतुकीसोबतच जलमार्गांचे सक्षम जाळे उभारल्यास अनेक गावे आणि शहरे जलमार्गाने जोडता येतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करून नागरिकांना पर्यायी आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल असे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

जलवाहतूक विकसित झाल्यास स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. त्यामुळे गोव्यातील रो-रो सेवेच्या धर्तीवर सिंधुदुर्ग आणि कोकणातील संभाव्य जलमार्गांचा अभ्यास केला जात असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत, प्रशांत देसाई, डॉ. निलेश बाणवलीकर, सूरज देव्हाद्या, बाबू नाईक, साईल देसाई तसेच सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, संतोष कानडे, डॉ. अमोल तेली आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा