Sindhudurg news : सिंधुदुर्गात २२ नोव्हेंबर रोजी भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिराचे कसाल येथे आयोजन

शेअर करा

विविध शासकीय योजनांचा लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला व आरोग्य तपासणीची सुविधा

 सिंधुदुर्ग,दि.२३ ऑक्टोंबर
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी कसाल येथे भव्य कायदेविषयक सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल, ता. कुडाळ येथे हे शिबिर होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, मोफत कायदेविषयक सल्ला आणि आरोग्यविषयक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली या महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा वकील संघ तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
 महाशिबिराच्या नियोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २१ ऑक्टोबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी व विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 या महाशिबिराचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचवून त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. यासाठी विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे स्वतंत्र माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, विविध सेवांचा लाभ आणि पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जागेवरच भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार असून, कायदेशीर हक्क, शासकीय योजना आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरणही करण्यात येईल. याशिवाय आरोग्य विभागामार्फत उपस्थित नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड आणि आधार कार्ड अद्ययावत करण्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 बैठकीत डॉ. सुधीर देशपांडे यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय व सुसूत्रता राखून महाशिबिर यशस्वी करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू नागरिकांनी या महाशिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  डॉ. सुधीर देशपांडे सिंधुदुर्ग यांनी केले आहे., 

अधिक माहितीसाठी संपर्क : आर. व्ही. नडगदल्ली, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ व दोडामार्ग येथील तालुका विधी सेवा समिती कार्यालये.
ई-मेल : [email protected]
संपर्क क्रमांक : ०२३६२-२२८४१४ / ८५९१९०३६०७
हेल्पलाईन क्रमांक : १५१००

शेअर करा