Sindhudurg News :ब्लॅकमेलिंगचे राजकारण खपवून घेणार नाही- आ.निलेश राणे

शेअर करा

पिंगुळीतील ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार ; विकासाच्या चुकीच्या गोष्टी असल्यास प्रशासनाने लक्ष देण्याच्या केल्या सूचना

सिंधुदुर्ग ,दि.०३ नोव्हेंबर

पिंगुळी येथील ग्रामस्थ आणि विकासक यांच्यात काही मुद्यावर वाद झाले आहेत.ग्रामस्थांच्या प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत.
विकासकाच्या प्रतिनिधींशी सर्वांसमक्ष चर्चा करून प्रकल्पामुळे पाणी दूषित होणार नाही, पाण्याच्या स्रोतांना बाधा पोहोचणार नाही तसेच रिटेनिंग वॉलसंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.मात्र, ग्रामस्थांचा होत असलेल्या विरोधाचा आधार घेऊन विकासकांना वेठीस धरणे आणि त्यातून आर्थिक हित साधण्याचे राजकारण आपण सहन नाही.ब्लॅकमेलिंगचे राजकारण खपवून घेणार नाही,असा इशारा आ .निलेश राणे यांनी दिला आहे.तसेच ग्रामस्थांच्या पाणी आणि तलावाच्या प्रश्नावर मध्यस्थी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले की, ग्रामस्थांचे प्रश्न पुढे करून विकासकांना वेठीस धरणे आणि त्यातून स्वतःचे आर्थिक हित साधण्याची पद्धत काही लोकांची आहे. यापूर्वीही अनेक विषयांमध्ये नकारात्मक भूमिका घेऊन स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न झाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या फोन संभाषणात मतदारसंघाच्या प्रश्नांऐवजी स्वतःच्या मायनिंग फाईलबाबत चर्चा केल्याचा दाखला देत आ.निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली.

बोलताना राणे यांनी विकासकाशी असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांसमोर स्पष्ट खुलासा करण्याचे आव्हान दिले.

संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊन देवासमोर हात ठेवून निवडणुकीपूर्वी विकासकाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा लाभ घेतलेला नाही, असे स्पष्ट सांगावे.पिंगुळीतील ग्रामस्थांच्या पाण्याचा आणि तलावाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याची तयारी आहे. ग्रामस्थांनी सांगितल्यास आपण त्यांच्यासोबत कधीही चर्चेला बसण्यास तयार आहोत. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्नांचा वापर करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे आ.निलेश राणे यांनी म्हटले.

याप्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहे. विकासक मोठा असो वा लहान, याच्याशी प्रशासनाला काही देणेघेणे नसावे. ग्रामस्थांना त्रास होत असल्यास तो थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत. चुकीचे काम होत असल्यास प्रशासनाने शंभर टक्के ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहावे, अशा सूचना आपण देणार असल्याचे आ.निलेश राणे यांनी सांगितले.

शेअर करा