सिंधुदुर्गला मिळाले प्रतिनिधित्व; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती
सिंधुदुर्ग ,दि.२१ सप्टेंबर
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या संयोजक व सहसंयोजक पदांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे प्रभारी कैलास वर्मा यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यामध्ये कोकण विभागाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या सहसंयोजकपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, मागण्या आणि सुविधांबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी या माध्यमातून त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, रेल्वे गाड्यांना थांबे, फेऱ्यांमध्ये वाढ, प्रवासी सुविधा तसेच कोकण रेल्वेशी संबंधित प्रश्न शासन व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकोष्ठाच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.
निलेश तेंडुलकर यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्गसह कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीची माहिती भाजपा माध्यम प्रमुख गोविंद वेतेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. नियुक्तीबद्दल निलेश तेंडुलकर यांचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.