सिंधुदुर्ग : राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवाहन

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१२ ऑगस्ट

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 4 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
AIIMS, IIM, IIIT, NIT, IISC, IISER तसेच भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मान्यता प्राप्त नामांकित संस्थांसह इतर पात्र शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्यातील 100 अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात येते.
योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी निर्धारित केलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय, संगणक आदी शुल्क संबंधित संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच वसतिगृह व भोजन शुल्क संबंधित संस्थेने आकारलेल्या रकमेच्या मर्यादेत सत्रनिहाय देण्यात येते. विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी 5 हजार रुपये आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी 5 हजार रुपये, असे एकूण 10 हजार रुपये दोन टप्प्यांत देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देय आहे. केवळ महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेची सविस्तर माहिती, जाहिरात, अर्जाचा नमुना व नियमावली महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘जलद दुवे’मधील ‘ताज्या घडामोडी’ या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून विहित अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज परिपूर्ण भरावा व आवश्यक कागदपत्रांसह दि. 4 सप्टेंबर 2026 पर्यंत आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे सादर करावा.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

शेअर करा