शिवसेना आ. निलेश राणे यांनी दाखवला भगवा झेंडा ; जोरदार घोषणाबाजी
सिंधुदुर्ग,दि.१२ सप्टेंबर
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून आपल्या कोकणातील गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि मोफत व्हावा, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर येथून ही विशेष रेल्वेगाडी कुडाळच्या दिशेने रवाना झाली. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा व हिरवा झेंडा दाखवत रेल्वे गाडी सोडली. यावेळी गणपती बाप्पा मोरया … निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा गणेश भक्तांनी दिल्या.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणवासीय मुंबई व उपनगरांतून आपल्या मूळ गावी जात असतात. रेल्वे व एसटीच्या गर्दीमुळे होणारा त्रास लक्षात घेता गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने ‘शिवसेना एक्सप्रेस’ची व्यवस्था आ. निलेश राणे यांच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय नागरिक उपस्थित होते. गणेशभक्तांमध्ये यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना या विशेष रेल्वेसेवेचा मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासादरम्यान गणेशभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.