सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गवासियांसाठी आरक्षित लेनचा लागला फलक

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या घोषणेची वचनपूर्ती ; 07 पार्सिंग असलेल्या वाहनधारकांना मिळणार दिलासा

सिंधुदुर्ग,दि.२१ ऑगस्ट

मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाक्यावर टोल वसुली करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून अधिसुचना काढण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग एमएच 07 पासिंगच्या वाहनधारकांचे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर टोल कंपनीने ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या अवाणिज्य वाहनांसाठी आरक्षित लेन असल्याचा फलक प्रदर्शित केले आहे. त्यामुळे ख-या अर्थाने 07 पार्सिंग असलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी दिली जाईल , अशी घोषणा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली होती. अखेर केलेल्या घोषणेची वचनपूर्ती झाली आहे.

महामार्गावर ओसरगाव येथे टोलनाक्यावर टोलवसुली अधिसूचना निघाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी २३ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा वासियांसाठी रिटर्न गिफ्ट जाहीर करत टोलमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या म्हणजेच एमएच ०७ पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करण्यात आले होते. तसेच पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या जिल्ह्यातील व्यावसायीक वाहनांसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी जाहिर केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून सूचना जाहीर करण्यात आली होती. यात मे. स्कायलार्क इन्फ्रा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ओसरगाव येथील टोलनाक्यावर १७ ऑगस्ट पासून टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याचे अधिसुचना आली होती. यात सिंधुदुर्ग मधील पिवळ्या नंबर प्लेट असणाऱ्या म्हणजेच व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत असल्याचे नमूद केले होते. परंतु सिंधुदुर्ग मधील अवाणिज्य वाहनांना सवलतीबाबत थेट उल्लेख नव्हता. अशा अवाणिज्य वाहनांना मासिक ३५० रुपये शुल्काचा पास देण्यात येणार असल्याचे नमूद होते. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या सवलतीबाबत काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र १७ ऑगस्ट पासून टोल वसुली सुरू होऊ शकली नव्हती. काही तांत्रिक कारणांमुळे टोल वसुली पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.त्ंयामुळे सिंधुदुर्ग वासियांसाठी स्वतंत्र लेन असणार का ? याबाबत वाहनचालकांमध्ये उत्सुकता होती.
अखेर आता सिंधुदुर्गातील वाहनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्यानुसार स्वतंत्र लेनच्या माध्यमातून सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत जाहीर झालेली असल्याने वाहनचालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा