सिंधुदुर्ग,दि.१० सप्टेंबर
आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहे प्रामुख्याने डोंगराळ व वनक्षेत्रालगतच्या भागात आहेत. या परिसरात विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता लक्षात घेता दि. 19 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी सर्पदंश हा अधिसूचित (Notifiable) आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद व अहवाल सादर करणे, त्यांचे निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच Anti-Snake Venom (ASV) ची उपलब्धता व साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जाणे, सर्पदंशाच्या वेळी योग्य प्रथमोपचार, सर्पदंशाबाबतचे अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि घाबरून न जाता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातून सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती सत्रादरम्यान कोणताही जिवंत साप शाळेच्या परिसरात आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करू नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व परिचारिका यांनी आपत्कालीन संपर्कांची माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे. यामध्ये जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, एएसव्ही उपलब्ध असलेल्या अथवा साठवणूक केलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल. अभियानादरम्यान करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा लागणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत आवश्यक जनजागृती होऊन आपत्कालीन परिस्थितीत योग्य व तातडीचा प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सुरक्षित वर्तनाची सवय विकसित करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.