सिंधुदुर्ग : दिवाळीच्या गर्दीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

शेअर करा

मुंबई-तिरुवनंतपुरम आणि मुंबई-मडगाव मार्गावर विशेष रेल्वे सेवा; सिंधुदुर्गातील प्रमुख स्थानकांवर थांबे

सिंधुदुर्ग,दि.२७ सप्टेंबर

दिवाळी आणि पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम नॉर्थ तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या मार्गावर विशेष साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम नॉर्थ विशेष साप्ताहिक गाडी क्रमांक 01463 ही 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 4 वाजता सुटणार आहे. परतीची गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून 17 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी दुपारी 2.15 वाजता सुटणार आहे.

या गाडीला कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड यासह कोकणातील विविध स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्गातील प्रवाशांना दिवाळीच्या काळात मोठा फायदा होणार आहे.

याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान 01179/01180 विशेष साप्ताहिक गाडीही चालविण्यात येणार आहे. 9 ते 16 ऑक्टोबरदरम्यान मॉन्सून वेळापत्रकानुसार, तर 23 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान नॉन-मॉन्सून वेळापत्रकानुसार ही सेवा धावणार आहे.

या गाडीला कणकवली, सिंधुदुर्ग, थिवीम आणि करमळी यांसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

दरम्यान, गाडी क्रमांक 01180 चे आरक्षण 28 सप्टेंबर 2026 पासून प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वे सेवांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

शेअर करा